लातूर : शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक तंबाखू, गुटखा खावून थुंकणे गुन्हा असून, या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच आरोग्य उपसंचालक कार्यालय व इतर कार्यालयात अचानक भेट देऊन कोटपा २००३ कायद्याचे कोण उल्लंघन करते का, याबाबत पडताळणी केली जात आहे. या पडताळणी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात नऊ जणांना या कायद्याचे उल्लंघन करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जि. प. चे सीईओ अभिनव गोयल, आरोग्य उपसंचालक डॉ. ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ एप्रिल रोजी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर धाडी टाकल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांत एकच तारांबळ उडाली. तंबाखूविरोधी कायदा (कोटपा-२००३) नुसार शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असताना, सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन, विक्री करण्यास बंदी आहे.
अचानक भेट देऊन पाहणीतंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अचानक भेटी देऊन तपासणी केली जात आहे. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उटीकर, अभिजित संघाई, झिया शेख यांच्या पथकाने सरकारी कार्यालयात पाहणी केली असता काहीजण तंबाखू सेवन करताना आढळून आले. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती जिल्हा सल्लागार डॉ. उटीकर यांनी दिली.