लातूर : जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने बुधवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालय, तसेच सर्वशिक्षा अभियान परिसर येथे छापा मारला असता नऊ कर्मचाऱ्यांना तंबाखू सेवन करताना रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्याकडून १६०० रुपयांचा दंड वसूल केला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी टाकलेल्या छाप्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असताना तंबाखू पदार्थांचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तारांबळ उडाली असून, तंबाखूविरोधी कायदा (कोटपा-२०२३) नुसार शासकीय कार्यालयात, तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन व विक्री करण्यास बंदी आहे. त्यानुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अचानक भेटी देऊन पाहणी करण्यात येते. जे दोषी आढळतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. बुधवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, तसेच सर्वशिक्षा अभियानाच्या कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना नऊ जण आढळले. त्यांच्याकडून १६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ सेवनास मनाईजिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे, तसेच थुंकण्यावर मनाई आहे. याचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी नियंत्रण कक्षाकडून पथक तयार करण्यात आले आहे. सर्वच शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे उल्लंघन करू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी केले आहे.
या पथकाने केली कारवाईतंबाखूमुक्त कार्यालय करण्याच्या आदेशानुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकातील डॉ. माधुरी उटीकर, अभिजित संघई, प्रकाश बेंबरे, संध्या शेदुळे यांच्या पथकाने शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन ही कारवाई केली. नऊ जणांना तंबाखूचे सेवन करताना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल केला.