लातूर : ‘आयपीएल’ क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या ९ जणांना पाेलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून राेख १ लाख ३५ हजार, १२ माेबाइल, दाेन वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील सहाजणांना अटक करण्यात आली असून, तीन फरार झाले आहेत. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर शहरात विविध ठिकाणी मोबाइलवरुन ऑनलाइन आयपीएल क्रिकेटवर बेटिंग (सट्टा) घेत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे अहमदपुरात तीन ठिकाणी एकाचवेळी छापा मारला. यावेळी ५ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह सहाजणांना अटक केली असून, तीन फरार झाले आहेत. काहीजण मोबाइलवर सट्टा खेळताना तर काहीजण वहीत आकडेमोड करताना आढळून आले. पोलिस पथकाने ताब्यात घेतलेल्यांची अधिक चाैकशी केली असता, राधाकिशन ऊर्फ बाळू बालाजी वरंगलवाड (वय ३२, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर), अंतेश्वर पांडुरंग भताने (वय २०, रा. भतानेवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), नवनाथ वैजनाथ फड (रा. धर्मापुरी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), सुंदरलाल कलू राऊतरे (वय ३५, रा. गवळी गल्ली, अहमदपूर), शुभम कळू राऊतरे (वय २४, रा. गवळी गल्ली, अहमदपूर), लखन यादव (रा. गंगाखेड, जि. परभणी), धरम भीमलाल काबलिया (वय २५, रा. गवळी गल्ली, अहमदपूर), निलकांत गोपाल काबलिया (वय ३४, रा. अहमदपूर) आणि बाळू राजे (रा. अहमदपूर) अशी त्यांनी आपली नावे सांगितली. यातील सहाजणांना पाेलिसांनी अटक केली असून, तीन फरार झाले आहेत.
अटकेतील सहाजणांची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडे क्रिकेट सट्ट्याचे साहित्य, विविध कंपन्यांचे अनेक मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर-चाकूर उपविभागीय पोलिस अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने केली. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार तिघा आराेपींचा शाेध पाेलिस घेत आहेत.