लातूर : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील कारखान्यातून ७२ लाखांची विदेशी दारूचे बॉक्स घेऊन कोल्हापूरकडे निघालेला ट्रक चाकूर ते बोरगाव काळे दरम्यान चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. यातील दरोडेखोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी धाराशीव जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले, धर्माबाद येथून कोल्हापूरकडे निघालेल्या विदेशी दारुचा ट्रक चाकूर ते आष्टामोड दरम्यान जीप आडवी लावून थांबविला. यावेळी चार ते पाच जणांना ट्रकमध्ये घुसखोरी केली. यावेळी चालकासह इतरांना चाकूचा धाक दाखवून स्टेअरिंगवर ताबा मिळवला. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्यावर चादर टाळली. हा ट्रक तसाच बार्शी महामार्गावरील बोरगाव काळे येथे आणला. ट्रकमधील चालकासह इतरांना खाली उतवण्यास सांगितले. यावेळी महामार्गालगतच्या शेतात दोरखंड, शर्टने हातपाय बांधले. त्यानंतर तो ट्रक दारुसह पळविला. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तुळजापूर-सोलापूर महामार्गावर पोलिसांना सापडला रिकामा ट्रक...हा ट्रक तुळजापूर-धाराशिव महामार्गावरील तामलवाडी नजीक १२ मे रोजी सापडला. मात्र, यातील दारुचे बॉक्स लंपास करण्यात आले होते. दरम्यान, गुन्हा दाखल होताच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलीस ठाणे यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांचीपोलिसांकडून झाली झाडाझडती...स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड, धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे तपास करून अशा पद्धतीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींना ताब्यात घेत कसून चौकशी केली. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला. त्यांना धाराशिव जिल्ह्यातून तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटलेल्या विदेशी दारूचे ९०० बॉक्स आणि ट्रक असा एकूण ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थागुशा, सायबर क्राईम शाखेने ७२ तासात गुन्ह्याचा लावला छडा...ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, सपोनि. प्रवीण राठोड, पोउपनि. संजय भोसले, रियाज सौदागर, राजेश कंचे, योगेश गायकवाड, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, रामहरी भोसले, मनोज खोसे, खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, दीनानाथ देवकते, रवी गोंदकर, तुराब पठाण, नितीन कटारे,मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, चालक नकुल पाटील, सचिन मुंडे, प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे, व्यंकट निटुरे यांच्या पथकाने ७२ तासात केली. यामध्ये सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नलिनी गावडे, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांनी महत्वाची भूमिका बजवल आहे.