अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील महादेववाडी येथील एका युवकाने दारूच्या नशेत शेत नावावर करुन दे म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत पाण्याच्या हौदात टाकून दिल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मुलाविरुद्ध अहमदपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी येथील विक्रम प्रकाश चामे याने अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित शेती आपल्या नावावर करण्यासाठी आईकडे तगादा लावला होता. परंतु आई वनिता प्रकाश चामे (वय ५५) यांनी शेती नावावर करून दिलेली नव्हती. त्यामुळे आरोपी विक्रम याने आपल्या आईचा काटा काढण्याचे निश्चित केले. २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. यात आईचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले. त्यानंतर मयत आईला फरफटत छतावर नेऊन पाठीमागे असलेल्या पाण्याच्या हौदात टाकून घातपात झाल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिस चौकशीत खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात कैवल्या ज्ञानोबा गंगावारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, पोलिस निरीक्षक बी.डी. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्मिता जाधव, पो.ह. बी.पी. साळवे, केशव जायभाये, शिवशंकर चोले, शिंदे करीत आहेत.
पोलिसी खाक्या दाखविताच गुन्ह्याची कबुली...अहमदपूर पोलिसांनी हौदातील मयताचे प्रेत बाहेर काढून पंचनामा केला. त्यांना मुलावर संशय आल्याने अधिक विचारपूस केली असता आरोपी विक्रम चामे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.