लातूर : खरेदी केलेल्या खुल्या प्लॉटची ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला नोंद करून ८ अ उतारा देण्यासाठी दीड हजाराची लाच घेणाऱ्या नरवटवाडीचे ग्रामसेवक महादेव राम कांबळे (रा. अवंतीनगर, बार्शी रोड, लातूर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेणापूर तालुक्यातील कामखेडा चौकात रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तक्रारदाराने रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी येथे सन २०१६ मध्ये खुला प्लॉट खरेदी केला होता. या प्लॉटची ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला नोंद करण्यासाठी आणि ८ अ उतारा देण्यासाठी नरवटवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महादेव कांबळे यांनी तक्रारदारास दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. २० सप्टेंबरला शासकीय पंचासमक्ष आरोपी कांबळे यांनी लाचेची मागणी केली. सोमवारी रेणापूर येथील कामखेडा चौकात लाच स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संतोष बर्गे, पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलिस हेड कॉन्स्टेबल. फारुक दामटे, भागवत कठारे, भीमराव आलुरे, शाम गिरी, पोलिस कॉन्स्टेबल शिवशंकर कच्छवे, संदीप जाधव, मपोकॉ. रूपाली भोसले, शाहाजान पठाण, पोलिस कॉन्स्टेबल. मंगेश कोंडरे, गजानन जाधव, किरण गंभीरे यांनी पार पाडली.