लातूर : भांडणाच्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना अटक न करता सोडून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला आणि दाखल गुन्ह्यात भविष्यात मदत करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक युवराज बालाजी जाधव यांना एक हजाराची लाच स्विकारताना बुधवारी दुपारी पथकाने पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार यांनी दयानंद कॉलेज गेट पोलीस चौकी येथे जाऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोना. युवराज जाधव (वय ३२, रा. श्रीनगर, लातूर) यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम एक हजार रुपये पंचासमक्ष स्वतः स्विकारल्याने त्यांना जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक पंडीत रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, भास्कार पुल्ली यांच्या पथकाने आरोपीस लाच स्विकारताना रंगेहात पकडले. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त रक्कम मागितल्यास तक्रार करावी, असे आवाहन लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.