रेणापूर : घरात वडिलांनी फाशी घेतल्याची खोटी माहिती पोलिस हेल्पलाइन क्र. ११२ वर देऊन पोलिसांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याप्रकरणी तालुक्यातील वांगदरी येथील एका युवकावर रेणापूर पोलिसांत बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, ११ एप्रिल रोजी रात्री ८.०९ वा. च्या सुमारास विलास नावाच्या मुलाने मोबाईलवरुन ११२ क्रमांकाच्या पोलिस हेल्पलाइनवर कॉल करुन आपल्या वडिलांनी घरी फाशी घेतल्याची माहिती दिली. तेव्हा पेट्रोलिंगवरील पोलिस कर्मचारी अरुण बनसोडे व आनंद बुधोडकर यांनी रेणापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कन्हेरे यांना कळविले. पोनि. शिंदे यांनी तात्काळ सपोउपनि. कन्हेरे यांना घटनास्थळी जाऊन प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले.
विलास याने केलेल्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करून चौकशी केली. तेव्हा त्याचे वडील बाहेरगावी गेले असल्याचे समजले. त्यानंतर गावात चौकशी केली असता अशी घटना घडली नाही. विलासचे वडील बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली. वांगदरीतील विलास कराड याने पोलिसांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने फोन करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी रेणापूर पोलिसांत बुधवारी रात्री पोलीस कर्मचारी अरुण बनसोडे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विलास कराड याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.