लातूर : मयत व्यक्तीच्या नावावर असलेली ३१ लाखांची कार बनावट स्वाक्षरी आणि कागदपत्राच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर करुन विक्री करत शासनाची फसवणूक केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, श्रीरंग उत्तमराव भताने (रा. कृपासदन राेड, लातूर) हे मयत असताना त्यांच्या नावावर असलेली ३१ लाख रुपयांची कार (एम.एच.२४ ए.डब्ल्यू. ४७४७) मयत व्यक्तीच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला उभा करुन, त्यांच्या स्वाक्षऱ्या करुन कार दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केली. लातूर येथील जुन्या चारचाकी वाहन खरेदी-विक्रीचा व्यवहार करणारे नितीन संजय ढगे (रा. नांदेड राेड, लातूर) यांनी शासनाची दिशाभूल करुन, उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एजंट रसुल करिमखान पठाण उफ के. के. उर्फ गुड्डू (रा. अग्रेसन भवन, लातूर), अजीम अलीमाेद्दीन शेख (रा. उस्मानपुरा, लातूर) यांच्या मार्फत कार फारख खादर यांच्या नावावर केली.
याप्रकरणी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या सविता राजेश चव्हाण यांनी विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. श्रीरंग भताने हे जिवंत असल्याचे दाखवून, बनावट स्वाक्षरी करुन वाहनावरील कर्जाचा बाेजा चढवून आणि उतरवून शासनाची दिशाभूल केली. शिवाय, आर्थिक फायदा करण्यासाठी फसवणूक केली.
याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुरनं. ७९ / २०२२ कलम ४२०, ४६४, ४६५, ४६९, ४७१, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संजय ढगे याला पाेलिसांनी अटक केली असून, त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. तर अजीम अलीमाेद्दीन शेख याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. तर रसुल करीमखान पठाण हा फरार झाला असल्याचे तपासाधिकारी सहायक पाेलीस उपनिरीक्षक एम.एम. गळगटे म्हणाले.