राजकुमार जाेंधळे / लातूर : हाेळी गावात क्षुल्लक कारणावरून माधव केरबा यादव (वय ४०) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री ७:३० ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात शनिवारी पहाटे चार जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एका अल्पवयीन मुलासह महिलेला ताब्यात घेतले आहे. दाेघे जण अद्यापही फरार आहेत. एका जखमीवर लातुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाेलिसांनी सांगितले, रेखा संभाजी यादव (३२, रा. हाेळी, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रकाश जाधव याने शुक्रवार, ५ जानेवारी राेजी रात्री ७:३० वाजता विनाकारण नमस्कार का केला म्हणून जाब विचारण्यास फिर्यादी आणि तिचा पती संभाजी यादव, सासू समिंदरबाई, दीर माधव यादव असे गेले हाेते. दरम्यान, माधव यादव याने प्रकाश जाधव यास तू सकाळी नमस्कार का केलास? अशी विचारणा केली असता, प्रकाश जाधव याने माधव यादव यास घरात ओढून त्यास मारहाण करून हातातील चाकूने गळ्यावर, छातीवर, पाेटावर, डाव्या मांडीवर वार केले. यामध्ये ताे रक्तबंबाळ हाेऊन ओरडू लागल्याने फिर्यादी आणि फिर्यादीचे पती, सासू त्यास साेडविण्याचा प्रयत्न करताना प्रकाश जाधव याने फिर्यादीचे पती संभाजी यादव याच्या डाव्या बाजूच्या बरगडीवर चाकूने वार केले. त्यावेळी सतीश जाधव व त्याचा मुलगा आणि पत्नी प्रभावती यांनी आपसात संगनमत करून काठीने जबर मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीच्या सासूलाही काठीने मारहाण केली. फिर्यादीच्या दिरावरही चाकूचे वार करण्यात आल्याने रक्तबंबाळ झाला.
शनिवारी पहाटे औसा ठाण्यात गुन्हा दाखल
घटनास्थळी औसा उपविभागीय पाेलिस अधिकारी रामदास इंगवले, पाेलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, सहायक पाेलिस निरीक्षक प्रकाश लाेंढे यांच्यासह पथकाने भेट देऊन पंचनामा केला. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात शनिवारी पहाटे प्रकाश जाधव, सतीश जाधव, प्रभावती जाधव आणि एक अल्पवयीन मुलाविराेधात गुरनं. ०२/२०२४ कलम ३०२, ३०७, ३२४, ५०४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील महिला आणि एका अल्पवयीन मुलाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक राहुलकुमार भाेळ हे करीत आहेत.