राजकुमार जाेंधळे / लातूर : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लातुरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या उघड चाैकशीत ही बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, बळीराम गणपत चौरे (वय ५४ रा. आवंती नगर, लातूर) यांची सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे नेमणूक आहे. त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर कार्यालयाने उघड चौकशी केली. त्यांनी संपादित केलेली मालमत्ता ही त्यांच्या ज्ञात आणि कायदेशीर स्रोताच्या माध्यमातून संपादित केली का? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती दिली नाही. शिवाय, संपादित मालमत्तेबाबत पुरावे सादर करू शकले नाहीत. लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत प्राप्त कायदेशीर उत्पन्नापेक्षा अधिकची मालमत्ता स्वतःसह पत्नीच्या नावे जाम केल्याचे चौकशीत समाेर आले. ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ही ४८.८० टक्के बेहिशेबी मालमत्ता आहे. त्याची किंमत ७६ लाख ८९ हजार ४०२ रुपयांवर आहे.
याबाबत लातुरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्यात एसीबीचे पाेलिस निरीक्षक भास्कर राजन्ना पुल्ली यांनी दिलेल्या तक्रारीवरून बळीराम चौरे याच्यासह पत्नीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.