लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षारक्षकाने रुग्णाला सलाईन लावल्याचा प्रकार १६ जून राेजी समाेर आला हाेता. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालयातील कंत्राटी सुरक्षा रक्षकासह एका अधिपरिचारिका विराेधात गांधी चाैक पाेलिस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रेणापूर तालुक्यातील शब्बीर फतरु शेख (वय ५८) यांना उपचारासाठी वार्ड क्रमांक २१ मध्ये दाखल करण्यात आले हाेते. १६ जून राेजी कंत्राटी सुरक्षारक्षकाने रुग्णाला सलाईन लावल्याचा व्हिडीओ साेशल मीडियामध्ये व्हायरल झाला हाेता. घडल्या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. याबाबतच्या चाैकशीसाठी तीन सदस्यांची उच्चस्तरीय चाैकशी समिती नियुक्त केली हाेती. दरम्यान, सुरक्षा रक्षक आणि अधिपरिचारक यांच्याकडे काेणताही वैद्यकीय अधिकृत परवाना नसताना रुग्णावर उपचार केल्याचा ठपका त्यांच्यावर चाैकशीत ठेवण्यात आला आहे.
याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात वैद्यकीय अधीक्षक सचिन भानुदासराव जाधव (वय ४३ रा. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अधिपरिचारिका रेशमा रमेश जगताप आणि कंत्राटी सुरक्षा रक्षक राजेंद्र अप्पाराव शिंदे यांच्याविराेधात गुरनं. २७० / २०२३ कलम ३०८, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी दिली.