लातूर : लातूर महानगरपालिकेने महिलांसाठी मोफत शहर बस सेवा सुरू केली असून, डिसेंबर २०२२ अखेर २३ लाख ८५ हजार १२० महिलांनी या मोफत बससेवेचा लाभ घेतला आहे. या योजनेवर होणाऱ्या खर्चाची प्रतिकृती महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात येते. यंदाच्या महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तुत योजनेसाठी पूर्वीप्रमाणेच तरतूद करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत २८ फेब्रुवारी २०२२ रोजी ठराव घेण्यात आला होता. त्या ठरावानुसार मोफत बस सुरू झालेली आहे. गेल्या वर्षभरात या योजनेत २३ लाख ८५ हजार १२० महिलांनी मोफत बस सेवेचा लाभ घेतला असल्याचे अंदाजपत्रक सादर करताना मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले. १८ मार्च २०२२ ते डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत २३ लाख ८५ हजार १२० महिलांना योजनेचा फायदा झाला. एका फेरीत किमान ३५ महिलांना बस सेवेचा लाभ दिला जात आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक महिलांनी मोफत सेवेचा लाभ घेतलेला आहे.
या सेवेसाठी कंत्राट संस्थेला संस्थेला त्यांच्या मागणीनुसार महिला व बालकल्याण विभागांकडून मनपाच्या परिवहन विभागाकडे आणि परिवहनकडून संबंधित संस्थेला प्रवासाचा मोबदला दिला जातो. महिलांसाठी मोफत बससेवा सुरू करणारी लातूर महानगरपालिका देशातील पहिली असून, दहा रुपये तिकिटाचा दर ग्राह्य धरून कोट्यवधींचा हा प्रवास होतो. महिलांना सुरक्षित आणि मोफत प्रवास देणारी ही योजना महापालिकेने पुढील वर्षीही सुरू ठेवली असून, या योजनेसाठी अंदाजपत्रकात तरतूद केली असल्याची माहिती अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.
महिला व बालकल्याण विभागासाठी अडीच कोटींची तरतूदशहरातील अंगणवाडी यांना साहित्य उपलब्ध करून देणे याकरिता या आर्थिक वर्षांमध्ये दोन कोटी ५८ लाख ६० हजार चारशे एक रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.