लातूर : ऑगस्टमध्ये पावसाने महिनाभर ताण दिल्याने जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरून निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात २५ टक्के अग्रीम देण्याच्या सूचना पीक विमा कंपनीस केल्या. तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी अद्याप पीक विमा कंपनीकडून प्रशासनास कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अग्रीम मिळण्याची आशा धुसर झाली आहे.
यंदा जिल्ह्यात विलंबाने पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्याही लांबल्या. जिल्ह्यात खरिपाचा ९८ टक्के पेरा झाला. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला. तो ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर आहे. तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी अशा अन्य पिकांचा पेरा ८८ हजार ७४६ हेक्टरवर झाला. दरम्यान, जेमतेम पाऊस झाल्याने पिके चांगली उगवली; मात्र जुलैच्या अखेरपासून ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाने ताण दिला. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत असल्याने हंगाम मध्य परिस्थिती सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट झाले.
पीक विमा कंपनीचा प्रतिसाद मिळेनाजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारकांना महिनाभरात २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे १ सप्टेंबर रोजी आदेश दिले. २६ दिवस उलटले तरी अद्याप पीक विमा कंपनीकडून कुठलीही हालचाल सुरू नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने शासनामार्फत पाठविलेला प्रस्ताव पीक विमा कंपनीने अद्याप मान्य अथवा अमान्य केल्याचे स्पष्ट केले नाही. एकूणच कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अग्रीम मिळेल का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
पावसापेक्षाही बेभरवशाची पीक विमा कंपनीयंदा पावसाने मोठा ताण दिल्याने खरिपातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. सध्या सण, उत्सव सुरू आहेत. त्यामुळे संभाव्य नुकसानीपोटीची २५ टक्के अग्रीम मिळेल, अशी आशा होती. त्यासाठी वारंवार बँकेकडे चौकशी केली; मात्र खात्यावर छदामही जमा झाला नाही. त्यामुळे आगामी सण कसे साजरे करावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, अशी भ्रांत पडली आहे. पावसापेक्षाही पीक विमा कंपनी बेभरवशाची झाली आहे.- गुणवंतराव माने, शेतकरी.
पीक विमा कंपनीशी पत्रव्यवहारजिल्ह्यातील साठही महसूल मंडळातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के अग्रीम शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना पीक विमा कंपनीस दिल्या आहेत. ही अग्रीम लवकर देण्यात यावी, म्हणून आम्ही कालच पीक विमा कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
पीक विम्यासाठी ८ लाख अर्जतालुका - एकूण अर्जअहमदपूर - १,१४,९९०औसा - १,२५,९००चाकूर - ७६,०८५देवणी - ४८,२७६जळकोट - ५७,४६०लातूर - ७२,७२९निलंगा - १,४६,२६९रेणापूर - ५२,०७५शिरुर अनं. - ३६,१५१उदगीर - १,००,५७०एकूण - ८,३०,५०५