लातूर : भरधाव बसने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ती कार समोरील ऑटो रिक्षावर आदळली. या विचित्र अपघातात कार आणि ऑटोचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना औसा शहरात गुरुवारी रात्री घडली. याबाबत औसा पोलिस ठाण्यात बस चालकावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, औसा शहरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस (एम.एच. २० डी. एल. २१५६) चालकाने औसा शहरातून प्रवास करणाऱ्या भारत श्रीमंत ढगे (वय ४७ रा. आंधोरा ता. औसा) यांच्या कारला (एम.एच. १४ जी. ई. ००२१) पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बसने कारला जोराची धडक दिल्याने ही कार समोर असलेल्या ऑटो रिक्षावर आदळली असून, यात ऑटोचेही दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अपघात लातूर जिल्ह्यातील औसा शहरात घडली. याबाबत कार चालकाने औसा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.