लातूर : शहरातील कव्हा नाका परिसरात असलेल्या राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयाच्या वसतिगृहातील अदिती अंगद यादव (वय १७, रा. विजोरा ता. वाशी जि. धाराशिव) विद्यार्थिनीने सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. १७) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, धाराशिव जिल्ह्यातील अदिती यादव ही मुलगी लातुरातील राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत हाेती. दरम्यान, ती याच महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात खाेली क्रमांक २०५ मध्ये वास्तव्यास हाेती. खाेलीतील सिलिंग फॅनला नायलाॅन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गुरुवारी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी गांधी चाैक पाेलिस ठाण्याला दिली. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पंचानामा केला.
याबाबत वसतिगृहातील कर्मचारी सारिका राजू जाधव (वय ४२) यांनी दिलेल्या माहितीवरून गांधी चाैक पाेलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक एन. जी. पवार करीत आहेत.
घरात दीड एकर शेती अन् आर्थिक अडचणमयत मुलगी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार हाेती. दरम्यान, गुणवत्तेच्या जाेरावर तिला लातुरातील राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात प्रवेश मिळाला हाेता. सध्या ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत हाेती. मात्र, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची हाेती. घरात दीड एकर काेरडवाहू शेती यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत हाेता.
वडिलांनी शिक्षणाच्या खर्चाची तयारी दर्शवली हाेतीसततची आर्थिक विवंचना आणि पित्याची हाेणारी ओढाताण पाहून मयत मुलगी नैराश्यात हाेती, असे तिच्या कुटुंबीयांनी पाेलिसांना सांगितले. मात्र, अभ्यासामध्ये हुशार असल्याने कुटुंबीयांनीही तिच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दाखवली हाेती. त्याचबराेबर शाहू महाविद्यालयाने आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्तीही दिली हाेती. शेतातील नापिकी, घरची परिस्थिती आणि आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थिनीने वसतिगृहातील फॅनला गळफास घेत स्वत:चे जीवनच संपविले.
दहावीला मिळविले हाेते १०० टक्के गुणमयत विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवित १०० टक्के गुण घेतले हाेते. या गुणवत्तेच्या बळावर तिचा लातुरात विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला हाेता. वर्गात दरवर्षी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण हाेणाऱ्या मुलीने घरच्या परिस्थितीपुढे मात्र हात टेकत आत्महत्या केल्याने कुटुंबीयांवरच दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.