लातूर : वीज बिल भरणा करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या परिसरात पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा महावितरणचा सतत प्रयत्न आहे. ग्रामिण भागातील वीज ग्राहकांना वीजबील भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेत महावितरणने सुरू केलेल्या महापॉवर पे वॉलेट द्वारे पैसे कमावण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली महापॉवर पे पेमेंट वॉलेट नव्याने गतीमान करण्यात आले आहे. वॉलेटधारकांनी पाच हजार रूपयाचे प्रथम रिचार्ज करून महावितरणच्या ॲपमध्ये नोंदणी केल्यानंतर महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेऊ शकतील. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर भरणा जमा झाल्याचा एसएमएस तत्काळ मिळणार असल्याने ग्राहकांचे जागेवरच समाधान होत आहे. एसएमएस सोबतच वीजबिल भरल्याची थर्मल पेपरवरील पावती तत्काळ ग्राहकांना दिली जात आहे.
वॉलेटसाठी आवश्यक कागदपत्रे...महापॉवर पे पेमेंट वॉलेट सुरू करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी नोंदणी क्रमांक (आवयश्क असल्यास), शॉप ॲक्ट प्रमाणपत्र, फोटो, व रद्द केलेला धनादेश.
कोण करू शकतो अर्ज...वयाचे १८ वर्ष पुर्ण झालेला कोणताही व्यक्ती, किराणा दुकानदार, जनरल स्टोअर्स चालक, मेडीकल दुकानदार तसेच बचत गट अर्ज करू शकतो. त्यांना प्रत्येक पावतीस पाच रूपये याप्रमाणे दर महिन्याच्या शेवटी वॉलेट धारकाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. इच्छुकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या संकेतस्थळावरील लिंकवर अपलोड करून ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक, छोटे व्यावसायिक व बचत गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.