अंधाेरी (जि. लातूर) : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पाय घसरुन खाली काेसळलेला मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी किनगाव येथे घडली. दरम्यान, उपचारासाठी अंबाजाेगाई येथे नेताना मजुराचा वाटेतच मृत्यू झाला. वजीर दस्तगीर शेख (रा. किनगाव) असे मयत बांधकाम मजुराचे नाव आहे. अशी माहिती पाेलिसांनी बुधवारी सायंकाळी दिली.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. मंगळवारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन ताेल गेल्याने ताे मजूर खाली जमीनवर काेसळला. यामध्ये ताे गंभीर जखमी झाला. त्याला किनगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजाेगाईला नेताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. वजीर शेख हे बांधकामाला पाणी मारण्याचा काम करत हाेते. अचानक त्यांचा ताेल गेल्याने ते खाली पडले. जखमी असलेल्या मजुराला उपचारासाठी किनगावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनातून अंबाजाेगाईला नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मात्र, आंबेजोगाईला जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. असा आराेप संतप्त नातेवाईकांनी केला आहे.
मजुराचा मृतदेह किनगाव येथील आराेग्य केंद्रात आणून नातेवाईकांनी ठिय्या मांडला. यावेळी सहायक पाेलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी नातेवाईकांची समजूत काढली आणि काही वेळानंतर वाद निवळला.