मुरुड (जि. लातूर) : शेती बदलीच्या कारणावरुन कुरापत काढून गैरकायद्याने एकत्र जमत एकावर कुऱ्हाड, सत्तुरने वार करुन एकाचा खून केल्याची घटना लातूर तालुक्यातील शिराळा येेथे घडली. याप्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात शनिवारी नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनराज काळे (४३, रा. शिराळा, ता. लातूर) असे मयताचे नाव आहे. मुरुड पोलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील शिराळा येथील आरोपी बाळासाहेब काळे, गोपाळ काळे, मनोहर काळे, राजेभाऊ काळे, कविता काळे, अनिता काळे, ओम काळे, संभाजी काळे, गणेश काळे हे नऊ जण शुक्रवारी गैरकायद्याने एकत्र जमले. दरम्यान, धनराज काळे हे ट्रॅक्टर (एमएच २४, बीएल ४५०९) वरुन घराकडे येत होते. तेव्हा या नऊ जणांनी त्यांचे ट्रॅक्टर अडविले. शेती बदलीची कुरापत काढली आणि धनराज काळे यांच्या डोक्यात, हाता-पायावर, पाठीत कुऱ्हाड, सत्तुर, कोयता आणि रॉडने वार करण्यास सुरुवात केली. त्यात ते जागीच ठार झाले.
दरमयान, फिर्यादी अमोल काळे व साक्षीदार ऋषिकेश काळे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दोन्ही हाताच्या मनगटावर, डाव्या पायाच्या गुडघ्यावर, डोक्यात, हाताच्या कोपऱ्यावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमोल काळे यांच्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये वरील नऊ जणांविरुध्द मुरुड पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. डी.एस. ढोणे हे करीत आहेत.