उदगीर (जि. लातूर) : एकाला शेतात बोलावून घेत जुना दाखल असलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणून, जबर मारहाण करण्यात आल्याची घटना मलकापूर शिवारात घडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात दाेघांविराेधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील मलकापूर येथील फिर्यादी हणमंत मोहन गायकवाड यांना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मलकापूर शिवारात विशाल पाटील यांच्या शेतात जेवणाला बोलावून घेण्यात आले. दरम्यान, फिर्यादीस मागील आठ ते नऊ वर्षांपूर्वी दाखल आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे का घेत नाहीस? अशी विचारणा करत गोविंद राजकुमार पवार याने हणमंत गायकवाड यांना डाेक्यात दगडाने, पाठीत जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली. तर विशाल युवराज पवार याने जातिवाचक शिवीगाळ केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दाेघांविराेधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन करत आहेत.