राजकुमार जाेंधळे / लातूर : चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने जागेवरच जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी लातुरातील जिल्हा व सत्र न्यायालयासमाेरील मार्गावर घडली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा येथील एकजण लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी सकाळी काही कामानिमित्त आले हाेते. दरम्यान, ते न्यायालयातील काम आटाेपल्यानंतर दुपारच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून न्यायलयातून बाहेर पडले. अशाेक हाॅटेल चाैकाकडून ते छत्रपती शिवाजी महाराज चाैकाकडे निघाले असता, त्यांच्या दुचाकीने न्यायालयासमाेरील रस्त्यावरच अचानक पेट घेतली. यावेळी त्यांनी दुचाकी जागेवर थांबवून पहिल्यांदा डिक्कीमधील महत्त्वाची कागदपत्र बाहेर काढून स्वत: सुरक्षित ठिकाणी थांबले.
याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. काही वेळात घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंब, जवान दाखल झाले आणि त्यांनी पेटलेल्या दुचाकीची आग आटाेक्यात आणली. मात्र, या आगीमध्ये दुचाकी पूर्णत: जळून खाक झाली आहे. घटनास्थळी शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून, याबाबत नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पाेलिस निरीक्षक दिलीप सागर म्हणाले.