लातूर : खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा हरंगुळ येथील कैदी पॅरोलवर कोरोना काळात बाहेर पडला होता. मात्र तो फरार झाला आहे. याबाबत लातुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात कार्यरत असलेले पोलीस हवालदार नारायण भिमराव मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील रोहित बालाजी वाघमारे याला लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिवाय, दोन हजारांचा दंडही सुनावला असून, दंड नाही भरला तर सहा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावली होती. दरम्यान, कोरोना काळात कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कैदी रोहित वाघमारे यालाही 12 मार्च 2021 रोजी पॅरोलवर सोडले होते. पॅरोलचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर तो पुन्हा कारागृहात 2 जून 2022 हजर होणे गरजेचे होते. मात्र, तो हजर न होता फरार झाला. दरम्यान, याबाबत अखेर लातुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी दिली.