लातूर : शहरातील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गांधी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरा घडली. यात गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यास पोलिसांनी तातडीने लातुरात शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकती गंभीर असल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रकिया सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले, पांडुरंग शंकरराव पिटले (वय ५० रा. मंठाळे नगर, लातूर) हे सद्याला विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात नियुक्तीला होते. विेवेकानंद आणि लातूर ग्रामीण ठाण्याकडे तुरुंगाची (लॉकअप) सुविधा नाही. येथील आरोपी हे गांधी चौक पोलिस ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात येतात. विवेकानंद, लातूर ग्रामीण आणि गांधी चौक ठाण्याचे दोन-दोन कर्मचारी येथे कर्तव्यावर असतात. दरमयान, पांडुरंग पिटले हे शुक्रवारी रात्री कर्तव्यावर होते. रात्री उशिरा अचानकपणे बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्याने, ठाण्यात असलेल्या पोलिसांनी लॉकअपकदे धाव घेतली. त्यावेळी गंभीर अवस्थेत पिटले हे पडले होते. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, प्रकती गंभीर असल्याने पुढील उपचरासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक भागवत फुंदे यांच्यासह शहरातील सर्वच ठाण्याच्या प्रमुखांनी भेट देऊन पाहणी केली आहे. कर्मचारी पिटले यांनी डोक्यात गोळी झाडून का घेतली, यांचा शोध पोलिस घेत आहेत. असे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे म्हणाले.