लातूर : भांडण लागले दाेघांचे अन् वस्तऱ्याने केले वार तिसऱ्यावर... अशी घटना औसा तालुक्यातील बुधाेडा गावात शुक्रवारी घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात एकाविराेधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी शंकर मधुकर कांबळे (वय ३२, रा. बुधाेडा ता. औसा) हे घराकडे जात असताना, गावातीलच सूरज उत्तम कांबळे आणि बाळू गहिनीनाथ कांबळे या दाेघांचे भांडण एका सलून दुकानासामाेर सुरू हाेते. दरम्यान, भांडण सुरू असताना फिर्यादी घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी दाेघांचे भांडण वाढू नये म्हणून फिर्यादीने ते साेडविण्यासाठी प्रयत्न केले. दाेघांच्या भांडणात मध्यस्थी करत असताना बाळू गहिनीनाथ कांबळे याने समाेर असलेल्या कटिंगच्या दुकानातील वस्तरा घेत फिर्यादीच्या मानेवर वार केले. यामध्ये शंकर मधुकर कांबळे हा जखमी झाला आहे. शिवाय, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवार, २६ मे राेजी बुधाेडा गावात घडली.
याबाबत औसा पाेलिस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून बाळू कांबळे याच्याविराेधात गुरनं. २२५ / २०२३ कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस हवालदार सिरमवाड करत आहेत.