औराद शहाजानी (जि. लातूर) : अनाधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी निलंगा तालुक्यात पथकाने १० ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात एक बोगस डॉक्टर आढळून आला. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ८ जण दवाखाना बंद करुन फरार झाले होते.
बाेगस वैद्यकीय व्यवसायिकांना आळा घालण्यासाठी आरोग्य, महसूल, पंचायत समिती आणि पोलीस ठाण्याच्या वतीने तालुकास्तरावर संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. निलंगा तालुक्यात १८ ठिकाणी बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याच्या माहितीवरुन तहसीलदारांच्या सूचनेवरुन या पथकाने शुक्रवारी व शनिवारी औराद शहाजानी, कासारशिरसी, माळेगाव, तांबाळा, हंगरगा, होसूर, चांदोरी आदी ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात हाेसूर येथे देबाशिस दिलीप हंलदर (रा. करोळा, पश्चिम बंगाल) याला रंगेहात पकडण्यात आल्या. त्याच्याजवळील औषधीसाठा, इंजेक्शन, सलाईन, गाेळ्या आदी साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव कांबळे, डॉ. सुनील पाेतदार, आरोग्य कर्मचारी चाँदपाशा तांबाेळी, पाेलीस नाईक विश्वनाथ डाेंगरे यांच्या पथकाने केली.