लातूर : कष्टकरी, धुणीभांडी, मजुरी करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करुन सर्वेक्षण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जागतिक महिला दिनी बहुजन महिला हक्क परिषदेच्या वतीने शहरातील महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
बहुजन महिला हक्क परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात पार्वती लोखंडे, राणी लांडगे, शेख रशिदा, आशा गाढे, अनिता काळे, गवळण मस्के, उषा कांबळे, निशा कांबळे, आम्रपाली आल्टे, उमा गायकवाड, मनीषा पायाळ, कमल भालेराव, लता काळुंके, विजयमाला पायाळ, प्रमिला पायाळ, जयश्री मस्के, मनीषा पायाळ, पूनम गव्हाणे, केवळबाई गोचडे, शोभा पायाळ, पंचशीला कांबळे, इंदू गव्हाणे, इंदूबाई हजारे, सुरेखा इंगळे आदी सहभागी झाल्या होत्या.
शासनाने कष्टकरी महिलांची नोंद स्वतंत्रपणे करावी. या महिलांना वर्षातून दोनदा अनुदान द्यावे. त्यांच्या मुला- मुलींच्या मोफत शिक्षणाची व निवास भत्याची सोय करावी. कष्टकरी महिलांना घर बांधून द्यावे. वयोवृध्द कष्टकरी महिलांना निवृत्तीवेतन द्यावे. श्रमिक महिलांच्या कामाचे दर निश्चित करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. दिवसभर हे आंदोलन सुरु होते. मागण्यांसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.