उदगीर : एक घर एक झाड ही संकल्पना राबविल्यामुळे उदगीर तालुक्यातील बामणी गावाची ओळख आता गावाला सावली देणारे गाव म्हणून झाली आहे. शिवाय जुन्या गावठाणात व गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करून ती जगविण्यात आल्यामुळे बामणी गावाला स्मार्ट व्हिलेजसह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बामणी गावचे सुपुत्र व पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले राजकुमार बिराजदार यांच्या संकल्पनेतून १० एकर क्षेत्रावर असलेल्या 'हणमंत देवराई' व २०एकर क्षेत्रावरील 'शिवा नंदनवन' परिसरात उदगीरचे आमदार व राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वेगवेगळ्या प्रजातींच्या वृक्ष लागवडिंचा शुभारंभ करून १६ हजार झाडांची लागवड करून ती जगविण्यात आली आहेत. गावाचे सुपुत्र असलेले वन परिमंडळ अधिकारी बालाजी मुदाळे, विजयकुमार पाटील यांचे सतत मार्गदर्शन घेवून गावात कुऱ्हाडबंदी राबविण्यात आली आहे. तीन वर्षात गावांतील एकाही झाडावर कुऱ्हाड घालण्यात आली नाही.
बामणी गावच्या सरपंच प्रभावती बिराजदार, उपसरपंच दिलीप कांबळे, कोंडाबाई कांबळे, इंदूबाई पाटील, कीर्ती म्हेत्रे, दादाराव इंचुरे, दिलीप कवठाळे , काशीनाथ बिराजदार, संग्राम कांबळे, बालाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे यावर्षी ५ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाने अमृत सरोवर मंजूर केल्यामुळे या सरोवरातील पाणी लागवड केलेल्या झाडांना देण्यात येत आहे. पशु पक्षी व वन्य प्राण्यांना या सरोवरातील पाणी मिळत असल्यामुळे पशु, पक्षी व वन्य प्राण्यांत मोठी वाढ झालेली आहे. माझी वसुंधरा अभियानात बामणी आता मराठवाडा विभागाच्या स्पर्धेत आहे.
डॉ. आंबेडकर पार्क व बुद्ध गार्डन...बामणी येथे गावातील सव्वा एकर क्षेत्रावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क व बुद्ध गार्डन तयार करून बोधी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ग्राम पंचायतीची स्वतंत्र नर्सरी तयार करून या नर्सरीत वेगवेगळ्या प्रजातींची रोपे तयार करून गावाच्या परिसरात ती लावण्यात येत आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठीचा मिळाला पुरस्कार...बामणी व परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर अशा एकूण ५५ हजार वेगवेगळ्या प्रजातींच्या झाडांची लागवड करून ती जगविण्यात आली आहेत. गावात कुऱ्हाडबंदीचा कार्यक्रम राबविण्यात येत असल्यामुळे बामणीची ओळख ऑक्सिजन बँक म्हणून होत आहे. यामुळे या गावाच्या सरपंच प्रभावती बिराजदार यांना पर्यावरण संवर्धनाचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
स्मार्ट व्हिलेजमध्ये बामणी आले अव्वल...स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत बामणी गाव तालुक्यात सर्वप्रथम आल्यामुळे या गावास १० लाख रुपयांचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश गावाने दिला असून, ५५ हजार वृक्षांचे संगोपन करण्यात येत आहे. गावातील वृक्ष चळवळ पाहण्यासाठी विविध गावचे लोकप्रतिनिधी याठिकाणी भेट देत आहेत.