राजकुमार जाेंधळे / लातूर : उदगीर- लातूर महामार्गावर थांबलेल्या एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला पाठीमागून भरधाव इनाेव्हा कार धडकल्याची घटना डिग्रस पाटी येथे बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून, एक जागीच ठार तर सहा गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर येथून लातूरच्या दिशेने निघालेली एस.टी. महामंडळाची बस (एमएच २४ एयू ७९७२) डिग्रस पाटी येथे तिकीट तपासणीसाठी थांबविण्यात आली हाेती. दरम्यान, पाठीमागून भरधाव येणाऱ्या इनाेव्हा कारने (एमएच ०२ एक्यू ७८६८) थांबलेल्या बसला जाेराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण हाेता की, कारचा पार चेंदामेंदा झाला. या कारमधून प्रवास करणाऱ्या सातपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून, इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उदगीर-लातूर महामार्गावरील डिग्रस पाटी येथे घडला. अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक सुमेध बनसाेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
माजी राज्यमंत्री आ. संजय बनसाेडे यांनी केली पाहणी...
माजी राज्यमंत्री आ. संजय बनसाेडे हे उदगीर येथून लातूरच्या दिशेने बुधवारी दुपारी निघाले हाेते. दरम्यान, वाटेत डिग्रस पाटी येथे अपघात झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी आपले वाहन घटनास्थळी थांबवून अपघाताची पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेले पाेलिस अधिकारी, संबंधितांना उपचाराबराेबरच मदतीसाठी त्यांनी सूचना केल्या.