केळगाव (जि.लातूर) : लातूर-जहीराबाद महामार्गावरील केळगाव येथील वन उद्यानाच्या जवळ भरधाव आलेल्या कारने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना गुरूवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीवरील मीनाक्षी भालके यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती व नातू जखमी झाले आहेत.
निलंगा तालुक्यातील केळगाव पाटीच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावर लातूर-जहिराबाद महामार्गावर निटूर मोड येथील प्रताप भालके हे पत्नी मीनाक्षी व त्यांचा तीन वर्षाचा नातू घेऊन निलंग्याला रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त निघाले होते. त्यावेळी त्यांना भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या लांबोटा येथील कार क्रमांक एमएच ०४ एडब्ल्यू ९३७५ ने जोराची धडक दिली. यावेळी दुचाकीवरील प्रताप भालके व त्यांचा तीन वर्षाचा नातू हे जखमी झाला. तर पत्नी मीनाक्षी भालके यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव झाला. त्यांना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथून लातूरला हलविण्यात आले, मात्र लातूर येथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
कारने घेतल्या तीन पलट्या...
कार भरधाव असल्याने दुचाकीला धडक दिल्यावर किमान दोन ते तीनवेळा पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शि नागरिकांनी सांगितले. तसेच १०८ ही रूग्णवाहिका यायला उशिर झाल्याने खाजगी वाहनातून जखमींना रूग्णालयात नेण्यात आले. ढोबळेवाडी, माचरटवाडी येथील तंटाुक्तीचे अध्यक्ष रमेश लांबोटे हे या मार्गावरून जात होते, त्यांनी व सोबत असलेले नामदेव तेलंग यांनी अपघातील जखमींना तात्काळ रूग्णालयात पाेहचवले.