मुरुड (जि. लातूर) : विवाहासाठी पुण्याहून लातूरला निघालेल्या वाहनचालकाचा ताबा सुटल्याने जीप थेट हॉटेलमध्ये घुसली. तेव्हा चहा पीत बसलेल्या पाचजणांना जोराची धडक बसली. त्यात एकजण मयत झाल्याची घटना रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास टेंभूर्णी-लातूर मार्गावरील मुरुड बायपासजवळ घडली होती. यातील गंभीर जखमी झालेल्या सुरज युवराज घुटे (वय २३) याचा सोमवारी दुपारी लातूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यातील चिखली येथील जगताप कुटुंबीय नातेवाइकांच्या विवाह समारंभासाठी रविवारी लातूरला जीप (एमएच १२, पीसी ३७४०) मधून निघाले होते. त्यात चालक कल्पेश जगताप, अशोक जगताप व रंजना जगताप होते. दरम्यान, ही जीप टेंभूर्णी-लातूर मार्गावरील मुरुड बायपासजवळ पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि थेट हॉटेलमध्ये घुसली. तेव्हा तेजस मुंदडा, सूरज युवराज घुटे, आदित्य माळी, विवेक चांडक, दशरथ हिंगले (सर्वजण रा. मुरुड) हे चहा पीत बसले होते. जीपच्या अपघातात हे सर्वजण जखमी झाले.
त्यातील तेजस पवन मुंदडा यांचा मृत्यू झाला होता. तसेच सुरज घुटे हा गंभीर जखमी झाल्याने त्यास लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालावली. सुरज घुटे याचे वडील मुरुड येथे अडत व्यापारी असून, त्यांना सुरज एकुलता एक मुलगा होता. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समजताच घरच्यांनी आक्रोश केला.