राजकुमार जाेंधळे / किनगाव (जि. लातूर) : भरधाव वाहनाने एका दुचाकीला उडवल्याची घटना किनगावनजीक (ता. अहमदपूर) साेमवारी रात्री ९:३० ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीवरील दाेघेही जागीच ठार झाले आहेत. दुचाकी आणि पीकअपची समोरासमोर भीषण धडक झाली. संतोष शिवाजी देवदे (वय ४५), इस्माईल हक्कानी शेख (वय ४५, दोघेही रा. किनगाव) असे अपघातातील मयताची नावे आहेत.
पाेलिसांनी सांगितले, संतोष देवदे हा कारचालक म्हणून काम करीत होता. तर ईस्माईल शेख हा मिस्त्रीचे काम करीत होता. दोघेही (एम.एच. २४ बी.पी. ७८९९) या दुचाकीवरून किनगावकडे जात हाेते. दरम्यान, किनगाव-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवशंकर बावगे यांच्या शेतानजीक दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने समाेरासमाेर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दाेघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळाताच किनगाव ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी भेट देऊन पाहणी केली. दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अज्ञात वाहन हे पीकअप असून, ते किनगावकडून अहमदपूरकडे जात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातात ठार झालेल्या दाेघांचेही मृतदेह किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे.
मयत संतोष देवदे यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तर इस्माईल शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नाेंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.