- महेश पाळणेलातूर : डावखुरा अष्टपैलू व सलामीवीर फलंदाज समर्थ देवडेने १४ वर्षांखालील आंतरजिल्हा स्पर्धेत उस्मानाबादकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. या जोरावर त्याची बडोदा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनतर्फे पुणे व कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत लातूर येथील पॅकर्स क्लबचा खेळाडू तथा बसवणप्पा वाले इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी समर्थ (एकनाथ) संतोष देवडे याने उत्कृष्ट सलामीवीराची भुमिका बजावत दर्जेदार फलंदाजी केली. आंतरजिल्हा स्पर्धेत सहा सामन्यात ८७.३३ च्या सरासरीने ५९६ धावा ठोकत उत्कृष्ट फलंदाजी केली. यासोबतच ११ बळी मिळवित अष्टपैलू प्रदर्शन केले. पुणे येथे झालेल्या सराव शिबिरातही ३ सामन्यांत ५८.६६ च्या सरासरीने १७६ धावा ठोकत राज्य संघात आपली निवड पक्की केली. त्यास राम हिरापूरे, उल्हास भोयरेकर, फिरोज शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीचे माजी रणजीपटू आशिष सुर्यवंशी, माजी राष्ट्रीय खेळाडू इम्रान पटेल, नवनाथ डांगे, अभय गडकरी, जयराज मुंडे यांनी कौतूक केले.
कोल्हापूरविरुद्ध द्विशतकी खेळी...आंतरजिल्हा सामन्यात समर्थ देवडेने कोल्हापूरविरुद्ध नाबाद २०३ धावांची खेळी करीत निवड समितीचे लक्ष वेधले होते. यासह सोलापूरविरुद्ध १९८ धावांची खेळी करीत आपल्या संघास आघाडी मिळवून दिली होती. ही कामगिरी त्यास सराव शिबिरासाठी महत्वाची ठरली.
कमी वयात मोठी कामगिरी...अवघ्या १२ वर्षांच्या समर्थने चौदा वर्षे वयोगटात तर आपल्या खेळीने उत्तम कामगिरी तर केलीच आहे. त्या सोबतच १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या गटात त्याने ३७५ धावा ठोकत कमी वयात त्याने चमकदार कामगिरी केली आहे.