किनगाव (जि. लातूर) : अहमदपूर येथे शिक्षणासाठी वास्तव्याला असलेल्या मुलांना दिवाळी सुट्ट्या लागल्याने आजोळी सोडण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा अहमदपूरकडे येताना अपघातात मृत्यू झाल्याची घटना खंडाळी गावानजीक घडली. त्यांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने जाेराने उडवले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पालम (जि. परभणी) तालुक्यातील गिरिधरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून दत्ता माणिकराव उगले (वय ४०, रा. उमरा, ता. पालम, जि. परभणी) हे मुलांच्या शिक्षणासाठी अहमदपूर येथे भाड्याच्या घरात कुटुंबासह वास्तव्याला हाेते. दरम्यान, मुलांना दिवाळी सुट्ट्या लागल्याने अमदापूर (जि. परभणी) येथील सासरवाडीत मुलांना सोडण्यासाठी दुचाकीवरून गेले हाेते. मुलांना त्यांच्या आजाेळी साेडल्यानंतर ते अहमदपूरकडे परत येत हाेते. खंडाळी-वंजारवाडी पाटी मार्गावर त्यांच्या दुचाकीला (एमएच २२ एएस ८४५२) भरधाव अज्ञात वाहनाने जाेराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. गंभीर जखमी शिक्षक दत्ता उगले यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी पहाटे साडेचार वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत दिगांबर माणिकराव उगले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किनगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृत दत्ता उगले यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.