राजकुमार जाेंधळे, औसा (जि. लातूर): पाहुण्यांना भेटून लातूरकडे निघालेल्या एका दुचाकीचालकाला गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना लातूर-औसा महामार्गावरील आलमला माेडवर रविवारी रात्री ८:४० वाजता घडली. यामध्ये दुचाकी चालक जागीच ठार झाला असून, राम पांडुरंग शिंदे (वय ५८, रा. बोधे नगर, लातूर) असे मयताचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, राम शिंदे हे औसा तालुक्यातील बोरफळ येथील पाहुण्यांना भेटण्यासाठी रविवारी गेले हाेते. दरम्यान, पाहुण्यांना भेटून ते पुन्हा रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास लातुरातील घराकडे दुचाकीवरुन (एम.एच. २४ ए.क्यू. २१११) निघाले हाेते. दरम्यान, लातूर-औसा महामार्गावरील आलमला मोडवर गॅस टाक्यांची उदगीरकडे वाहतूक करणाऱ्या ट्रकने (एम.एच. २४ ए.यू. २५३७) दुचाकीला चिरडले. यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जवळपास ३०० फुटापर्यंत दुचाकी फरफटत गेली. घटनास्थळी औसा ठाण्याच्या पोलिसांच्या भेट देऊन ट्रक ताब्यात घेतला आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
चार दिवसात दुसरा अपघात...
मागील चार दिवसात आलमला मोडवर झालेला हा दुसरा अपघात आहे. बुधवारी याच ठिकाणी महामंडळाची एसटी खड्ड्यात गेल्याची घटना घडली हाेती. तर आज रात्री दुचाकीस्वारला चिरडल्याची घटना घडली आहे.