लातूर : खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना आईवडिलांच्या पैशातून सहलीचा आनंद घेता येतो. मात्र, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे सहलीचे स्वप्न स्वप्नच राहते. मात्र, समग्र शिक्षाअंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानामुळे जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांना हैदराबादची सफर घडणार असून, विद्यार्थी, जि. प.चे तीन अधिकारी आणि शिक्षक गुरुवारी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, या सहलीचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे.
शासनाच्या वतीने आविष्कार उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सहलीचे आयोजन केले जाते. यामध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वांत गुणवत्तापूर्ण शाळा, शिक्षक व मुलांची निवड सीईओंच्या मान्यतेने करण्यात आली आहे. आविष्कारसाठी तीन लाखांचा निधीही शासनाकडून मिळालेला आहे. विद्यार्थ्यांना सहलीसाठी ब्लेझर, बूट, गणवेश, कॅप, टाय वितरित करण्यात आले आहेत. वेळापत्रकानुसार गुरुवारी सकाळी विद्यार्थी हैदराबादसाठी रवाना झाले आहेत. या ठिकाणी बिर्ला प्लॅनेटेरियम पाहणी होणार आहे. शुक्रवारी सकाळी रामोजी फिल्म सिटी, हुसेनसागर तलाव, बुद्धा स्टॅच्यू दर्शन, लुंबिनी पार्क व लेझर शो पाहणी होईल. तर २५ मार्च रोजी सकाळी गौळकोंडा किल्ला, गौळकोंडा दर्शन आणि दुपारी २ वाजेनंतर सहलीचे लातूरकडे प्रस्थान होणार आहे. सायंकाळी सातनंतर आगमन होईल. तीनदिवसीय सहलीमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद घेता येणार आहे. गुरुवारी सकाळी जि. प. येथून सीईओ अभिनव गोयल, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून बसेस रवाना करण्यात आल्या.
या विद्यार्थ्यांची झाली निवड...लातूर तालुक्यातील सिद्धांत सोनपेठकर, भक्ती कदम, रेणापूर प्रगती जगताप, विठ्ठल मदने, औसा पार्थ जाधव, आनंदी पोतदार, निलंगा पार्थ पाटील, श्रुती निलंगे, शिरुर अनंतपाळ समर्थ काळु, श्रुती सुरवसे, देवणी समाधान सूर्यवंशी, साक्षी मुळखेडा, उदगीर सूरज वाघमारे, सुषमा सोनवणे, जळकोट वेदान्त केंद्रे, जान्हवी नामवाड, अहमदपूर संकेत देवकते, श्रुती देवकते तर चाकूर रागिनी बोरोळे, संभाजी काळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये दहा मुले तर मुलींचा समावेश आहे.
जि. प.चे तीन अधिकारी सहलीसोबत...
हैदराबाद सहलीसाठी जि. प. प्राथमिकचे अधीक्षक मधुकर वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष स्वामी, बालरक्षक समन्वयक चंद्रकांत ठाकरे, शिक्षक प्रमोद हुडगे, शिक्षिका शिवाबाई भोजलने आणि अनुराधा ठोंबरे यांचा समावेश आहे. तीन दिवसांच्या सहलीमध्ये हैदराबादमधील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली जाणार असून, विद्यार्थ्यांचा सर्व खर्च शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. त्यासाठी तीन लाख रुपयांचा तरतूद करण्यात आली आहे. समग्र शिक्षाअंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत ही सहल रवाना झाली आहे.