लातूर: दुचाकीवरून निघालेल्या एका महिलेला ट्रॅव्हल्सने चिरडल्याची घटना लातुरातील सम्राट चाैकात साेमवारी घडली. हा अपघात एवढा भीषण हाेता की, महिला जागीच ठार झाली. तर, अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिस हवालदार शाहू दत्तात्रय बनसाेडे यांनी गांधी चाैक पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, लातूर शहरातील सम्राट चाैकातून खासगी ट्रॅव्हल्स (एम.एच. २४ ए.यू. ७२००) जात हाेती. यावेळी स्कूटीवरुन (एम.एच. २४ बी.के. २९३९) एहसान खदीर बागवान (वय १५) हा मुलगा आणि महिला मौसमी देबनाथ सुमेन (वय २२, रा. सेलापूर, ता. होगली, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) हेही प्रवास करत हाेते. दरम्यान, स्प्लेंडर प्लस दुचाकीवरून (एम.एच. २४ बी.के. ६६०७) यश दशरथ कारुंबे हा तरुणही प्रवास करत हाेता. साेमवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास दाेन दुचाकी आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात स्कूटीवरील महिलेला ट्रॅव्हल्सने चिरडले. हा अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. अपघातात यश दशरथ कारूंबे, सुमित माणिक बोयणे आणि शैला धोंडीराम बोयणे (रा. सिकंदरपूर ता. जि. लातूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पंचानामा केला असून, दुचाकी, ट्रॅव्हल्स ताब्यात घेतले आहेत. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक काेले करत आहेत.
लायसन्स नाही; वाहन मालकावर गुन्हा दाखल...
परवाना नसतानाही आपले वाहन दुसऱ्याच्या हाती देणाऱ्या दाेघा वाहन मालकांविराेधात गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये स्कूटी मालक गौस माजीदसाब बागवान (रा. साळेगावी, लातूर) याने १५ वर्षीय एहसान खदीर बागवान याला लायसन्स नसताना स्कूटी चालविण्यासाठी दिली. शिवाय, दुचाकी मालक समीर दिलावर शेख (रा. सिकंदरपूर, जि. लातूर) याने यश दशरथ कारूंबे यालाही लायसन्स नसताना दुचाकी चालविण्यासाठी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.