नळेगाव (जि. लातूर) : पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चाकूर तालुक्यातील नळेगाव शिवारात घडली. सत्यपाल दिगंबर बाेरुळे (वय ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची चाकूर पाेलिस ठाण्यात मंगळवारी नाेंद करण्यात आली आहे.
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील शेतकरी सत्यपाल दिगंबर बाेरुळे हे साेमवारी सकाळी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी विहिरीतून पाणी काढत हाेते. दरम्यान, त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. त्यांना पाेहायला येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. विहिरीची खाेली अधिक असल्याने, ६० फुटांपेक्षा अधिक पाणी हाेते. दरम्यान, विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मंगळवारी सकाळी नळेगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत शेतकरी उच्चशिक्षित...
मयत शेतकरी सत्यपाल बाेरुळे हे उच्चशिक्षित हाेते. त्यांचे डी. फार्मसीचे शिक्षण झाले हाेते. ते एका नामांकित कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नाेकरी करत हाेते. मात्र, गत पाच वर्षांपूर्वी त्यांनी या नाेकरीला रामराम ठाेकत गावाकडे घरची शेती करत हाेते. साेमवारी पाणी काढताना त्यांचा पाय घसरल्याने ते विहिरीत पडले आणि बुडून मृत्यू झाला.