लातूर : जिल्ह्यातील किनगाव-माेहगार मार्गावर एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या डाेक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना १४ एप्रिल राेजी घडली हाेती. याबाबत किनगाव पाेलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, आराेपी पाेलिसांना गुंगारा देत फरार हाेता. त्याला रविवारी पुण्यातून पाेलिसांनी उचलले. दहा दिवसांनंतर खुनाचा उलगडा झाला असून, गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला साेमवारी अहमदपूर न्यायालयात हजर केले असता, दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, किनगाव ते माेहगाव मार्गावर एका शेतात लिंबाच्या झाडाखाली दगडाने ठेचलेल्या अवस्थेत अनाेळखी मृतदेह आढळून आल्याची घटना १४ एप्रिल राेजी घडली. या व्यक्तीचा अज्ञाताने खून केल्याप्रकरणी किनगाव ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. गुन्ह्यातील आराेपीच्या अटकेसाठी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आदेश दिले. दरम्यान, गुन्ह्याचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या पथकाकडून सुरू हाेता. खबऱ्याने या खुनाची आणि आराेपीची माहिती दिली. या माहितीच्या आधारे हा गुन्हा तेजस शिरसाट (रा.शिरसाटवाडी) यांने केल्याचे समाेर आले. त्याच्या अटकेसाठी पाेलिस मागावर हाेते. तो नातेवाईक, मित्राच्या संपर्कातही नव्हता. त्यांच्या शाेध घेणे पोलिसांसाठी एक आव्हान होते. ताे पाेलिसांना गुंगारा देत, ठिकाण बदलत हाेता. आराेपी हा पुण्यात असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने तेजस शिरसाट याच्या चाकण परिसरातून २३ एप्रिल रोजी मुसक्या आवळल्या. दारू पिताना झालेल्या शिवीगाळीवरून हा खून केल्याची कबुली त्याने दिली.
त्याला अहमदपूर न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस काेठडी मिळाली. कारवाई सपाेनि.भाऊसाहेब खंदारे, पोउपनि.संदीप अन्यबोईनवाड, सहापोउपनि.गोखरे, शिवाजी तोपरपे, नागनाथ कातळे, सुनील श्रीरामे यांच्या पथकाने केली.