औसा (जि. लातूर) : खानापूर फिडरवरील नादुरुस्त विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी एका खासगी व्यक्ती (झिरो लाईमन) खांबावर चढला. यावेळी विजेचा धक्का बसल्याने ताे ८० टक्के भाजला हाेता. दरम्यान, लातुरातील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. वर्षभरात तीन तर महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात बुधवारी नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अशोक तुकाराम कोलते (वय ४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ताे औसा तालुक्यातील कन्हेरी गावचा रहिवासी आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ते अनेक वर्षांपासून लाइनमनसोबत काम करत होते. नेहमीप्रमाणे खानापूर शिवारातून जाणाऱ्या खांबावरील नादुरुस्त विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाइनमनसह ते गेले होते. दरम्यान, जाताना रीतसर परवानगी घेऊन विद्युत पुरवठा बंद केला हाेता. त्यानंतर ते खांबावर चढले. यावेळी अशोक कोलते यांना विजेचा धक्का बसला. यात ते ८० टक्के भाजले हाेते. त्यांना लातुरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हाेते, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कन्हेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
खाजगी व्यक्ती खांबावर चढणे चुकीचे...अशोक कोलते यांच्या मृत्यूची आज घडलेली घटना धक्कादायक आहे. परवानगी घेऊनच ते खांबावर चढले हाेते. मात्र, तरीही विद्युत पुरवठा सुरू कसा झाला? याची चौकशी केली जाणार आहे. शिवाय, लाइनमन असताना खासगी व्यक्ती खांबावर चढणे चुकीचे आहे. याचीही चौकशी केली जाईल. - पी.व्ही. काळे, उपकार्यकारी अभियंता, औसा