निलंगा : सन २०१४ मध्ये सोयाबीनला ५ हजारांपेक्षा अधिक भाव होता. मात्र, सध्या हा भाव ४ हजारांवर आला आहे. दहा वर्षांत सोयाबीन लागवडीचा खर्च दुप्पट झाला अन् भाव कमी अशी स्थिती झाली आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळाला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांची आरती करुन काँग्रेसने सोमवारी साकडे घातले आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघातील २०३ गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. ही पूजा नंदाबाई व तानाजी डोके आणि राजेश्री व उमाकांत भंडारे या दाम्पत्यांनी केली. पौरोहित्य मन्मथ स्वामी व काशिनाथ स्वामी यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरुर अनंतपाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, देवणीचे तालुकाध्यक्ष ॲड. अजित बेळकोणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अरविंद्र भातांब्रे, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, पं.स. चे माजी सदस्य महेश देशमुख, लाला पटेल, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, अजित निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, तालुका कार्याध्यक्ष ॲड. नारायणराव सोमवंशी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर टोंपे, तालुकाध्यक्ष तानाजी डोके, कार्याध्यक्ष उमाकांत भंडारे, गिरीश पात्रे, धनाजी चांदुरे, अपरिजित मरगणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी अभय साळुंके म्हणाले, सध्या बाजारपेठेत केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षाही कमी दराने सोयाबीनची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नैराश्य येत आहे. त्यातून बाहेर पडावे म्हणून ही महाआरती करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.