रेणापूर (जि. लातूर) : रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे घरासमोर खेळत असताना व्यापारी नीळकंठ सावंत यांच्या ५ वर्षीय रियांशला आरोपींनी जबरदस्तीने कारमधून पळविले; मात्र पोलिसांच्या १२ पथकांचा ससेमिरा पाहून आरोपींनी २४ तासानंतर चाटा गावातील रस्त्यावर रियांशला सोडून पोबारा केला. सांगवी येथील देविदास विठ्ठलराव सावंत यांचा नातू रियांश काही दिवसांपूर्वी आजोबांकडे आला होता. रियांशचे वडील नीळकंठ सावंत हे मूळचे सांगवीचे असले तरी अनेक वर्षांपासून ठाणे येथे स्थायिक असून, त्यांचा तेथे मोठा व्यवसाय आहे. दरम्यना, शुक्रवारी रियांश घरासमोर खेळत असताना एक कार आली. त्यातील आरोपींनी रियांशला जबरदस्तीने कारमध्ये बसवून धूम ठोकली. शेजाºयांनी धावाधाव करून घरच्यांना माहिती दिली. आजोबा देविदास सावंत पोलीस ठाण्यात पोहोचले. गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी १२ पथके रवाना केली. अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी सांगवीत जाऊन घटनाक्रम जाणून घेत तपासचक्रे गतिमान केली.चाट्यातील मुलाची तत्परता२४ तास उलटून गेल्यानंतरही रियांश भेटत नव्हता. परंतु, मुरुडनजिकच्या चाटा येथे एक लहान मुलगा रस्त्यावर एकटाच असल्याचे पाहून चाट्यातीलच एका मुलाने चौकशी केली. त्याच्या सोबत कोणीच नसल्याने मुलाला घेऊन तो सरपंचाजवळ आला. त्यानंतर पोलीस व कुटुंबीय रात्री उशिरा पोहोचले.मुलगा सुखरुप, अपहरणाचे कारण शोधणाररियांश सुखरुप असून, पोलीस पथकांनी २४ तास सर्वत्र धावाधाव केली. गुन्ह्यामागचे कारण शोधले जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस निरीक्षक माचेवाड यांनी चाटा येथे जाऊन रियांशची भेट घेतली.कुटुंबियांचा जीव भांड्यात२४ तासानंतरही रियांश सापडत नसल्याने आम्हाला चिंता वाटत होती, असे सांगत वडील नीळकंठ सावंत म्हणाले, मला कोणाचाही फोन आला नाही. आमचा तसा थेट कोणावर संशयही नव्हता. आता आमचा मुलगा सापडला, आम्हाला आनंद आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने संशयितांची यादी केली असून, ते छडा लावतील, असा विश्वास आहे.
अपहरण झालेला रियांश २४ तासांत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:09 PM