लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर रविवारी पार पडली. या परीक्षेसाठी २४ हजार ८८२ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. यांपैकी २४ हजार ६१२ विद्यार्थी उपस्थित, तर २७० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात येते. यामध्ये लातुरात या परीक्षेच्या तयारीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत होते. रविवारी दुपारी २ ते ५ या वेळेत ५४ केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.
लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, निलंगा, अहमदपूर येथील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. सकाळी ११ वाजल्यापासूनच पालक, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांबाहेर मोठी गर्दी केली होती. सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यात २४ हजार ८८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यांपैकी २४ हजार ६१२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले; तर २७० जणांची अनुपस्थिती होती, असे ‘नीट’चे जिल्हा समन्वयक तथा पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गिरिधर रेड्डी, विकास लबडे यांनी सांगितले. यंदा नीट परीक्षेसाठी लातूर शहरात ४६, उदगीर ४, निलंगा ३ आणि अहमदपूर शहरात ३ अशा एकूण ५४ केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती.
भर उन्हात केंद्राबाहेर पालकांची गर्दीलातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशावर पोहोचला असून, रविवारी ५४ केंद्रांवर नीटची परीक्षा पार पडली. सकाळी ११ वाजल्यापासून केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली. भर उन्हात पालकांना आपल्या पाल्यास केंद्रावर सोडविण्यासाठी यावे लागले. सर्वच केंद्रांवर शांततेत परीक्षा पार पडली असून, दुपारी १:३० वाजेपर्यंतच विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश देण्यात आला. निलंगा, अहमदपूर आणि उदगीर या ग्रामीण भागांत असलेल्या केंद्रावर जाण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली.