लातूर : लोकसभा निवडणुकीसाठी बीएलओ नियुक्ती करण्यात आलेला कर्मचारी एकदाही तहसील कार्यालयात हजर झाला नाही. त्यांना नोटीस दिली, सुपवायझर मार्फत निरोपही दिला, फोनही केला. तरीही उपस्थित होत नसलेल्या कर्मचाऱ्यास कर्तव्यावर येण्यासाठी लातूरच्या तहसीलदारांनी थेट पोलिसांना पत्र दिले. मग काय लागलीच पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला गुरूवारी तहसील कार्यालयात हजर करताच लेखी माफीनामा देऊन कामाला सुरूवात केली.
निवडणूक कामातून सुटका मिळावी म्हणून काहीजण विविध शक्कल लढवितात. त्यात एखाद्याचे कारण वैध असेल तर त्यांना कामातून सुटही दिली जाते. परंतू, वरिष्ठांनी नियुक्ती दिल्यावरही हजर न होणे हा आडमुठेपणाच. असा एक प्रकार लातूर तहसील अंतर्गत समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी लातूर येथील एका शिक्षकास बीएलओ म्हणून तहसीलदारांनी नियुक्ती केली. त्यानंतर मात्र, ते शिक्षक एकदाही तहसील कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यांना नोटीस देण्यात आली, त्यालाही उत्तर आले नाही, सुपरवायझरमार्फत फोनही गेला, तरीही कर्तव्यावर आले नाहीत. अखेर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी बुधवारी संबंधित बीएलओंना अटक करून हजर करण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांना पत्र दिले.
निवडणूक काम काळजीने करावे...लोकसभा निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांनी अटक करून आणलेल्या बीएलओने माफीनामा दिला आहे. तसेच गुरूवारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी यांनी जबाबदारीने काम करावे. हलगर्जीणपा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले.