१५ हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या हाळी गावास कायमस्वरूपी पाणी योजना नसल्याने ॠतुनुसार ग्रामपंचायतीला पाण्याचे नियोजन करावे लागते. पावसाळ्यात व हिवाळ्यात गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदीतून तर उन्हाळ्यात तिरू प्रकल्पातून पाणी व्यवस्थापन केले जाते. सध्या तिरू नदीतील पाणी संपुष्टात आले आहे. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नाही. अशातच वडगाव येथील विंधन विहिरीची पाण्याची मोटार बंद पडली आहे. परिणामी जलकुंभात पाणीसंचय होत नसल्याने सध्या नळाला पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना हात पंपाचा आधार घ्यावा लागत आहे. प्रकल्पावरून पाण्याचे नियोजन करणे अपेक्षित असताना त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या हाळी ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त असल्याने ग्रामविकास अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडे गाव कारभार आहे. अशातच निवडणूक लागली आहे. गल्लोगल्ली निवडणुकीच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाल्याने राजकीय मंडळी उमेदवारांच्या शोधात आहेत, तर सामान्य नागरिकांना पाण्याची चिंता लागली आहे. प्रकल्पात पाणी असतानाही नळाला पाणी येत नसल्याने धरण उशाला अन् कोरड घशाला म्हणण्याची वेळ हाळीकरांवर आली आहे.
कायमस्वरुपी पाणी योजना राबवा...
हाळी गावास पाणी पुरवठ्यासाठी कायमस्वरुपी पाणी योजना राबवावी. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. ऋतू बदलला की नागरिकांना पाण्याची धास्ती असते, असे गावातील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, याबाबत ग्रामविकास अधिकारी मनोहर जानतिने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकला नाही.