संदीप शिंदे
लातूर : जिल्ह्याचा भूभाग बेसॉल्ट नावाच्या कठीण अग्निजन्य पाषाणाने व्यापलेला असून खडक, सच्छिद्र, विघटित, भेगायुक्त या प्रकारात सापडतो. त्यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी प्रमाणात असते. त्यामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने रिचार्ज शाफ्टची संकल्पना राबविण्यात आली असून, जिल्ह्यात ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टमुळे जलपुनर्भरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.
जिल्ह्यात ५५ गावांत ४३७ रिचार्ज शॉफ्ट उभारण्यात आले असून, लातूर तालुक्यातील ६ गावांत ४८, औसा तालुक्यातील ५ गावांत ४०, निलंगा तालुक्यातील ६ गावांत ४८, रेणापूर तालुक्यातील ७ गावांत ५६, अहमदपूर तालुक्यातील ५ गावांत ४०, उदगीर तालुक्यातील ७ गावांत ५६, देवणी तालुक्यातील ६ गावांत ४८, जळकोट तालुक्यातील ५ गावांत ३७, चाकूर तालुक्यातील ५ गावांत ४० तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तालुक्यातील ३ गावांत २४ शाफ्ट उभारण्यात आले आहेत.
रिचार्ज शाफ्ट ही उपाययोजना अत्यंत कमी खर्चाची असून, परिणामकारक आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, यासाठी जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत ही संकल्पना राबविण्यात आली असून, २०१६-१७ मध्ये ७७ गावांत ३२७, २०१७-१८ मध्ये ६७ गावांत २७१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
अनेक गावांत उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. जलस्त्रोत कोरडे पडतात. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचे संवर्धन व्हावे, यासाठी रिचार्ज शाफ्टची उभारणी केली जाते. परिणामी, रिचार्ज शाफ्टजवळील अनेक जलस्त्रोतांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली असल्याचे जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भू-वैज्ञानिक डॉ. भालचंद्र संगनवार यांनी सांगितले.