लातूर : नळेगाव येथील घरफाेडीतील एका आराेपीला दाेन दिवसांतच पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून राेख रकमेसह ३ लाख १० हजारांचे साेन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, २३ ते २४ ऑगस्टच्या रात्री चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील एका घराचा दरवाजा उघडून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञातांनी लंपास केला. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार सहायक पाेलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पाेलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त करण्यात आले.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित संदीपान निवृत्ती कांबळे (रा. नळेगाव, ता. चाकूर) याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, त्याने घरफाेडीची कबुली दिली. चोरलेले सोने-चांदीचे दागिने असा ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल पाेलिसांच्या हवाली केला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, पोउपनि. कपिल पाटील, सुनील घोडके, सुग्रीव मुंडे, सूर्यकांत कोळेकर, नागरगोजे, संजू भोसले, राम गवारे, सुधीर कोळसुरे, बंटी गायकवाड, सिद्धेश्वर जाधव यांच्या पथकाने केली.