लातूर : एका माेटारसायकल चालकाला अडवत मारहाण करून लुबाडल्याची घटना लातुरात चार महिन्यांपूर्वी घडली हाेती. दरम्यान, याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. यातील तिघांपैकी एकाला पाेलिसांनी अटक करून त्याच्याकडून ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक चाैकशीत दाेन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
लातुरात मारहाण करुन एकाला लुबाडल्याच्या गुन्ह्यातील आराेपींचा शाेध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू हाेता. दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे १५ जानेवारी राेजी पथकाने अंकुश तानाजी जाधव (वय २१ रा. काेल्हेनगर, लातूर) याला ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, चार महिन्यांपूर्वी लातुरात एका माेटारसायकल चालकाला मारहाण करून माेबाइल हिसकावत पळ काढला हाेता. या गुन्ह्यात एकूण तिघांचा समावेश हाेता.
तसेच सुशील रमेश कांबळे (रा. कोल्हे नगर, लातूर) आणि विश्वजीत अभिमन्यू देवकते (रा. लातूर) यांचाही सहभाग असल्याची कबुली त्याने दिली. तिघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. ताब्यातील अंकुश जाधव याच्याकडून पळविलेला मोबाइलसह गुन्ह्यात वापरलेली माेटारसायकल पाेलिसांनी जप्त केली. गुन्ह्यातील अन्य दाेघांचा पाेलिस शाेध घेत आहेत.
लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात सोमनाथ श्यामराव सुळके (वय २७, रा. भातखेडा) याला ताब्यात घेतले असून, त्याने शेतातील पाण्याची माेटार व स्टार्टर्स चाेरल्याचे चाैकशीत समाेर आले. कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक फौजदार संजय भोसले, अंमलदार अंगद कोतवाड, राम गवारे, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, राजू मस्के, जमीर शेख, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रदीप चोपणे, नकुल पाटील यांच्या पथकाने केली.