अहमदपूर, (जि. लातूर) : पतीच्या डाेळ्यात मिरची पूड फेकून, सुया मारून, चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची घटना अहमदपूर शहरात ५ सप्टेंबर राेजी घडली. याप्रकरणी अहमदपूर पाेलिस ठाण्यात पत्नीसह इतर पाच जणांविरुद्ध सहा दिवसांनंतर मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, गाेविंद भगवान भिकाणे यांची पत्नी सोनाली भिकाणे मुलांच्या शिक्षणासाठी अहमदपुरात लेक्चर कॉलनी येथे राहते. पंधरा दिवसांपूर्वी पती- पत्नीत भांडण झाले. त्यामुळे गाेविंद भिकाणे हे हिंपळनेर (ता. चाकूर) येथे राहू लागले. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेहुणी अश्विनी खंदाडे यांनी फोन करून भिकाणे यांना सांगितले, तुमची पत्नी सोनाली माझ्या घरी आली आहे. विषारी द्रव प्राशन करून मरते, असे म्हणत आहे. तुम्ही लवकर येऊन तिला घेऊन जा. त्यावेळी फिर्यादी भिकाणे दुचाकीवरून अहमदपूर येथील आदर्श कॉलनीत मेहुणी अश्विनी यांच्या घरी गेले. त्यावेळी अश्विनीने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. पत्नी सोनालीने डोळ्यात सुयांनी वार केले. दोन्ही डोळ्यांतून रक्त निघू लागल्यामुळे गाेविंद भिकाणे जोरजोरात ओरडू लागले.
तेवढ्यात त्यांचा मेहुणा गोपाळ बाबूराव ऐलाने आणि मेहुणी अनुराधा पेद्देवाड आणि आणखी एक मेहुणी नागमोडे तिथे आल्या. त्यानंतर मेव्हणा व दोन्ही मेहुण्यांनी मिळून लाकडांनी गाेविंद यांना मारहाण केली, तर मेहुण्याने ओरडू नकोस म्हणून कापडाने ताेंड बांधले, तसेच चेहऱ्यावर ॲसिड टाकले. ते दोन्ही डोळ्यांत गेल्यामुळे भयंकर आग झाल्याचे भिकाने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी ११ वाजेच्या सुमारास गाेविंद शुद्धीवर आले. तेव्हा ते लातूरच्या शासकीय रुग्णालयात हाेते. त्यावेळी भिकाणे यांचा मोबाइल व खिशातील १५ हजार सापडले नाहीत.
या आशयाच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसांनी पत्नी सोनाली भिकाणे, मेहुणी अश्विनी खंदाडे, अनुराधा पेद्देवाड, नागमोडे आणि मेहुणा गोपाळ बाबूराव ऐलाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.