- राजकुमार जाेंधळे लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहतुकीचे नियम माेडणाऱ्या वाहनधारकांना पाेलिसांनी दंडाच्या माध्यमातून समज दिली आहे. बेशिस्त आणि नियम माेडणाऱ्यांवर पाेलिसांनी आपला दंडुकाच उगारला आहे. जानेवारी ते नाेव्हेंबरअखेर तब्बल ८० हजारांवर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तब्बल ६ काेटी १९ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा दंड केला आहे. आता या दंडाच्या वसुलीसाठी पाेलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, वसुलीला वाहनधारकांतून अल्प प्रतिसाद मिळत आहे.
लातूर शहर वाहतूक शाखेने दिलेल्या आकडेवारीनुसार, ११ महिन्यांत वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विविध कलमांन्वये त्यांच्यावर थेट खटलेही दाखल करण्यात आले आहेत. लातूर शहरातील चाैका-चाैकातील वाहतूककाेंडी आता नित्याचाच विषय झाला आहे. केवळ वाहनधारकांच्या बेशिस्तपणाचा फटका इतर वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. महात्मा गांधी चाैक ते गंजगाेलाई मार्गावर दिवसभर वाहतुकीचा खाेळंबा असताे. मध्येच अचानक घुसघाेरी वाहनधारकांमुळ बस स्थानकासमाेर वाहने काही काळ थांबतात, तर काही वेळा वाहतूककाेंडी हाेते. मात्र, या मार्गावर ही काेंडी फाेडण्यासाठी पाेलिस कर्मचारी तैनात असल्याचे दिसून येत नाही. अरुंद रस्ता आणि त्यातच रस्त्यालगत लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची समस्या आहे.
चालकांनी सर्वाधिक सिग्नल ताेडले...लातूर शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सिग्नलकडे दुर्लक्ष करत, पाेलिस कर्मचाऱ्यांची नजर चुकवत, सिग्नल ताेडणाऱ्या वाहनधारकांची सर्वाधिक संख्या आहे. जानेवारी ते नाेव्हेंबर या काळात तब्बल १० हजार २९० वाहनधारकांनी सिग्न ताेडले आहे. त्यांना ५१ लाख ४५ हजार रुपयांचा दंड केला आहे.
फक्त दहा मद्यपींवर कारवाई...मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांच्या विराेधात पाेलिसांनी फारशी कारवाई केली नसल्याचे समाेर आले आहे. जानेवारी ते नाेव्हेंबर या अकरा महिन्यांत केवळ १० मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविराेधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्याचबराेबर, बेदरकार वाहन चालविणाऱ्या २१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.