लातूर : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी घेतलेल्या झरी बु. येथील अमाेल शिंदे याने केलेले कृत्य चुकीचे आहे. मात्र, केंद्र सरकारने अतिरेकी असल्याचा ठपका ठेऊन लागू केलेली कलमे योग्य नाहीत. त्याची संपूर्ण चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.
आनंद दवे म्हणाले, चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल शिंदे याने केलेली घटना दुर्देवी आहे. मात्र, त्याने हे कृत्य का केले याचा शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत त्याला सोडलेल्या सुरक्षा रक्षकांसह त्या खासदारावरही कारवाई करण्यात यावी. प्रारंभी शिंदे याच्याविरुध्द सरकारने घाईने कलमे लागू केली आहेत. मात्र, ही कलमे लावण्यापूर्वी संपूर्ण चौकशी करणे आवश्यक होते. आता तरी सरकारने चौकशी करुन कारवाई करावी. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ, असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण मिळूनही भवितव्य घडेल यावर विश्वास नसल्याने, नोकऱ्यांचा बॅकलॉग भरला जात नसल्याने युवक अस्वस्थ आहेत, हे या प्रकरणातून दिसून येते. त्यामुळे राग कुठेतरी व्यक्त होतो. सरकारने हा राग समजून घेऊन बेरोजगारीवर उपाययोजना केली पाहिजे, असेही आनंद दवे म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी संघटनेचे प्रदेश पदाधिकारी मनोज तारे, विवेक परदेशी, सूर्यकांत कुंभार, उमेश कुलकर्णी, राहुल आवटी तसेच अमोल शिंदे याचा भाऊ संतोष शिंदे उपस्थित होता.